डॉ संजय ढोले :

" विज्ञानकथा या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनासाठीही लिहिल्या गेल्या पाहिजेत ",असे मानणारे डॉ संजय ढोले हे एक विज्ञानकथा लेखक आहेत. विज्ञानकथा फुलविताना विज्ञान हाच गाभा असायला हवा, तसेच वाचकांना कथेमध्ये गुंतवून ठेवतांनाच, योग्य स्थळी क्लिष्ट वैज्ञानिक कल्पनांचे स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे या गोष्टीची पूर्णपणे जाणीव असल्यामुळे डॉ ढोले हे एक यशस्वी विज्ञानकथा लेखक आहेत.
डॉ संजय ढोले यांचा जन्म ०६ नोव्हेंबर १९६५ साली शहादा तालुक्यात झाला. डॉ ढोलेंचे शालेय शिक्षण कनसाई,नंदूरबार,अमळनेर व पुणे येथे झाले, नंतर पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्रात एम.एस्सी. , एम फिल. करून त्यांनी पी.एच.डी. संपादन केली. नंतर नागोया विद्यापीठ ,जपान(१९९८-२०००) येथे त्यांनी पोस्ट डॉक्टरेट केली आहे.
२४ वर्षांपासून डॉ ढोले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच २८ वर्षांपासून न्युक्लियर,प्रवेगक,किरण,स्मृतिपटले,अर्धवाहक पदार्थ, निर्वाहक पदार्थ,स्फटिके,वैद्यकिय प्रवेगक इत्यादी शास्त्रीय विषयात संशोधन करीत आहेत. डॉ ढोलेंच्या लेखनातून या संशोधनाचा वाचकाला वारंवार अनुभव येतो.
डॉ ढोलेंचे " प्रतिशोध ", " प्रेमाचा रेणू ", "अश्मजीव ", " संकरित ", व " अंतराळातील मृत्यू " हे विज्ञानकथा संग्रह प्रसिध्द झालेले आहे. याशिवाय " डिंभक ", " खुजाबा " हे , विज्ञानकथा संग्रह व " साक्ष " ही विज्ञान कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य यशस्वीरीत्या डॉ ढोले यांनी एक लेखक म्हणून केले आहे. लेखन करतांना विज्ञानातील सूक्ष्मतंत्रज्ञान ,अवकाश,अणू,किरण,जैव,रसायन,भौतिकी इत्यादी सर्वच विषयांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंना डॉ ढोलेंनी समर्थपणे सांभाळले आहेत.त्याच बरोबर डॉ ढोलेंनी बालविज्ञान ,रहस्य,सामाजिक कथांचे ही लेखन केले आहे.
विज्ञान जनजागृतीची अजूनही समाजाला गरज आहे याची डॉ ढोलेंना जाणीव आहे. म्हणून खेडेगावांमध्ये जावून ते विज्ञानावर पथनाट्य, नाटक,मनोगत तसेच स्लाईड शो इत्यादींचे आयोजन करतात.
डॉ ढोलेंच्या या प्रदीर्घ कार्याची दखल घेत त्यांना बरेच पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.त्यात प्रामुख्याने "सोन्याची खाण" या विज्ञानकथेस, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनातर्फे दिला जाणारा 'गोपीनाथ तळवलकर' उत्कृष्ठ कथा पुरस्कार(सन २००५), महाराष्ट्र शासनाचा र.धो.कर्वे वाङमयीन पुरस्कार 'प्रेमाचा रेणू 'या विज्ञानकथा संग्रहास प्राप्त.(सन २००८), ज्ञानज्योती पुरस्कार,अविष्कार सोशल एन्ड एज्युकेशनल फौंडेशन,कोल्हापूर.२०१६, ईत्यादि.
निर्मिती :-  प्राजक्ता भुषणकुमार पाटील.